बॉलिवूड सिनेसृष्टीतील एकदम स्टायलिश अभिनेता म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा ओळखला जातो. मागील काही वर्षात सिध्दार्थचे काही चित्रपट फ्लॉप ठरले, परंतू गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शेरशहा या चित्रपटामुळे सिद्धार्थला बरीच प्रसिध्दी मिळाली. शेरशाह हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट होता. या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने विक्रम बत्रा ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पहायला मिळाली होती. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा ‘थँक गॉड’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. त्याचा हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
तर दुसरीकडे सिद्धार्थ पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे, त्याचे कारणही तसेच आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ या आगामी चित्रपटात सिद्धार्थ मुख्य व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा स्वतः करण जोहरने गेल्या वर्षी केली होती. योद्धा या चित्रपटामध्ये सिद्धार्थ सैन्यातील एका जवानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
करण जोहर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय आहे. तो त्याच्या चित्रपटांबद्दलचे नवनवीन अपडेट्स सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असतो. करणने नोव्हेंबर महिन्यात त्याच्या या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्याने “यशाची शिखरे जिंकल्यानंतर, धर्मा प्रोडक्शनच्या ‘योद्धा’ या पहिल्या अॅक्शन फ्रँचायझीची घोषणा करताना मला फार आनंद होत आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिका करणार असून सागर आब्रे आणि पुष्कर ओझा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.” असे म्हटले होते. ‘योद्धा’ चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे करणने सांगितले होते.
काही दिवसांपासून या चित्रपटाशी संबंधित आणखी माहिती समोर आली आहे. त्यानुसार सिद्धार्थसह दिशा पटानी आणि राशी खन्ना या अभिनेत्री सुद्धा आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, योद्धा हा चित्रपट नव्वदीच्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित असून सिद्धार्थ मल्होत्राच्या या अॅक्शन मूव्हीच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी संपूर्ण टीम मनालीला पोहचली आहे.
तर सिद्धार्थ मल्होत्राला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.