भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सर्वोत्तम विकेटकीपर म्हणून जगभरात ओळखला जाणारा क्रिकेटपटू म्हणजे महेंद्र सिंग धोनी. धोनीने मैदानावरील त्याच्या कारकीर्दीत आजवर अनेक नवनवीन विक्रम करीत चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहत्यांचा माही नक्की कसा घडला? आणि त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा झाला तो ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून. धोनीच्या बायोपिकमध्ये धोनीच्या मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत.
सुशांत सिंह राजपूत ने निर्मात्या एकता कपूर यांच्या २००८ मधील ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि अभिनय क्षेत्रात त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर मालिका क्षेत्रातील पवित्र रिश्ता या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतून तो घराघरांत पोहोचला. सुशांतने ‘काई पो छे’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यशाचे शिखर गाठत असतानाच १४ जून २०२० रोजी वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
त्यापूर्वी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून सुशांतने संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींची आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलाकाराची कलाकृती आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
क्रिकेटच्या जगातील जादुई क्षण देशभरातील क्रिकेट प्रेमींना पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळावी यासाठी स्टार स्टुडिओने एक निर्णय घेतला. तो म्हणजे सुशांतचा ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा संपूर्ण भारतभर हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. या निर्णयामुळे धोनीचेच नाही तर सुशांतचे चाहते देखील प्रचंड खुश झाले आहेत.