मागील काही दिवसांपासून बहुचर्चित असलेला सिनेमा म्हणजे ‘क्रू’. हा सिनेमा ३ एअर होस्टेसच्या आयुष्यावर आधारित आहे. या मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री. करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन या अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र सिनेमात दिसणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमाचे पोस्टर, टीझर सोशल मिडियावर व्हायरल होते. पण अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आणि या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.
यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती यांच्या सोबतच दिलजित दोस्तांज देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. त्याचसोबत कॉमेडीचा बादशहा म्हणजेच ‘कपिल शर्मा’ देखील या या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. थोडी कॉमेडी, थोडा ड्रामा आणि थोडा थ्रिलर याचं पॅकेज असलेला हा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान हा सिनेमा आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. या सिनेमात असलेले काही डायलॉग आणि काही सीनवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काही अपशब्द वापरण्यात आले आहेत. यावर देखील सेन्सॉर बोर्डाने कात्री फिरवली आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की तब्बू एका व्यक्तीला शिवीगाळ करत आहे. पण मूळ सिनेमात त्या शब्दाच्या जागी ‘भूतीये’ असा शब्द वापरण्यात येणार आहे. असेच अनेक शब्दांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’(CBFC) ने ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी यामधील अनेक सीन कट केले.
या सिनेमाचं दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केल आहे. तर निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, रिया कपूर आणि अनिल कपूर यांनी केली आहे. तसेच यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी हे दाखवण्यात आलं आहे. एका मृत व्यक्तीकडे असलेलं सोन या तिघी मिळून कसं चोरी करतात हे दाखवण्यात आलं आहे. तर दिलजित दोस्तांज एका कस्टम अधिकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी सगळेच उत्सुक झाले आहेत. तसेच कपिल शर्माला पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. त्यामुळे या सिनेमाला प्रेक्षक किती प्रतिसाद देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.