मराठी लोकप्रिय शोज् मधील अनेक वर्षांपासून नावाजलेलं नाव म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya). मागील १० वर्षांपासून या शोने देशातीलच नाही तर देशाच्या सीमेपाल्याड असलेल्या रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवले. उत्तम अभिनय आणि अचूक टायमिंग साधत विनोदवीराच्या राजपथावर बसलेले अनेक कलाकार या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike).
एखाद्यावर हसणं खूप सोप्पं असतं, पण एखाद्याला हसवणं खूप अवघड असतं. परंतू कुशलने गेली अनेक वर्षे सर्वांना मनमुराद हसवलं. कुशल बद्रिके याने चला हवा येऊ द्या शोमधून तब्बल १० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केले. त्याचा अभिनय, विनोदबुद्धी, टायमिंग असं सगळंच दमदार आहे, त्यामुळे त्याचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रीय असतो.
काल म्हणजेच १७ मार्च २०२४ रोजी चला हवा येऊ द्या या शोचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. शेवटचा भाग करताना जसे कलाकारांचे डोळे पाणावले, अगदी तसेच शेवटचा हा भाग पाहताना रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात देखील पाणी तरळले. त्यातच कुशलने त्याच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट करताना त्याने स्वतःचा चला हवा येऊ द्याच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. सेटवरील शेवटची आठवण म्हणून त्याने हा व्हिडीओ त्याच्या सोबत ठेवला हे नक्की. या व्हिडीओमध्ये त्याने मंचाला आणि प्रेक्षकांना हात जोडत नमस्कार केला. तसेच यावेळी त्याने तमाम रसिक प्रेक्षकांची माफी देखील मागितली.
पोस्ट शेअर करत कुशलने लिहिले की, “माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार. चूक भूल द्यावी घ्यावी…” तर या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. तसेच हा शो आणि यातील तुम्ही व तुमचे विनोद कायम आमच्या लक्षात राहतील अशा पद्धतीच्या कमेंट्स अनेकांनी केल्या. कमेंट करत एकाने लिहिले की, “बघता बघता कधी १० वर्ष झाली कळलं सुद्धा नाही… स्वतःचे दुःख बाजूला ठेवून, आम्हा प्रेक्षकांना तुम्ही सतत हसवलंत… त्यासाठी मनःपूर्वक आभार, आता सांगायचं झालं तर, आपल्या घरातून कोणी बाहेर गेलं, की कसा आपण त्याची वाट पाहत असतो… त्याच आशेने आम्ही तुमच्या सर्वांची वाट पाहू.” तर आणखी एकाने लिहिले की, “तुम्हा सर्वांची ह्या मंचावरची अनेक पात्र आयुष्यभर लक्षात राहतील. या मंचाने फक्त आनंदचे सोहळे दिले. तू या मंचावर जे केलस ते जीव ओतून केले आहेस.. त्यासाठी किती कष्ट घेतले आहेस हे सर्वश्रृत आहे… नवीन प्रवास सुरू होताना जुनं आनंदच गाव सोडव लागतं पण म्हणून त्या गावाची माया तुटत नाही… तुझ्या पुढच्या आनंदच्या सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा.”
View this post on Instagram
प्रेक्षकच नाही तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनीही या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता संतोष जुवेकर याने कमेंट करत लिहिले की, “तुम्ही परत येणार सगळे, नवीन रूपात, नवीन जोमात. ‘पुराना जायेगा तभी तो नया आयेगा.’ लव्ह यू ऑल आणि खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप हसवून हसवून आठवणी आणि खळखळते हसण्याचे क्षण आम्हाला दिले आहेत.”
अखेर आता चला हवा येऊ द्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला, पण जाता जाता पुन्हा नव्या जोमाने प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याचे सांगितले.