आपण खूप काळानंतर आपल्या नातेवाईकांना जरी भेटत असलो तरी त्यांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल आपल्याला नक्कीच माहित असते, ते म्हणजे सोशल मीडियामुळे. त्याचप्रकारे आपण आपल्या लाडक्या कलाकारांनाही सोशल मिडियामुळे खूप जवळून अनुभवत आहोत.
सोशल मिडियामुळेच कलाकारांच्या खासगी आणि व्यावहारिक गोष्टी सहज आपल्यापर्यंत पोहोचत असतात. परंतू मागील काही दिवसांपासून अनेक कलाकार सोशल मीडियापासून ब्रेक घेताना दिसत आहेत. ब्रेक घेण्यापूर्वी ते आपल्या चाहत्यांना ब्रेक घेत असल्याचा निर्णय देखील सांगतात. त्यांच्या या निर्णयामुळे काही चाहते नाराज होतातच.
तर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. सई नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव असते. ती कायम पती सोबतचे फोटोज् आणि तिच्या लग्नाचे प्रत्येक क्षण ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सईने नुकतच इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ती सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची माहिती दिली. स्टोरीमध्ये तिने लिहिले की, “मला गेल्या कित्येक दिवसांपासून एक गोष्ट करायची होती आणि अखेर आता मी ते करत आहे. मी पुढचे काही दिवस इंस्टाग्रामपासून ब्रेक घेणार आहे. मला हा ब्रेक घेण्याची फार गरज आहे.
मला माझ्या स्वत:साठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे आता मी तुमची रजा घेते. मी पुन्हा सज्ज झाल्यावर नक्कीच परत येईन. त्याबरोबर तुमच्यासाठी खूप काही घेऊनही येईन. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. खूप खूप प्रेम -सई”
तर आता सई सोशल मीडियावर पुन्हा कधी परतणार याचीच वाट सर्व चाहते पाहत आहेत.