मराठी सिनेसृष्टीतील आणि रंगभूमीवरील गाजलेले नाव म्हणजे अभिनेते प्रशांत दामले. मोरूची मावशी, एका लग्नाची पुढची गोष्ट ही त्यांची गाजलेली नाटके. दामले यांनी त्यांच्या नाटकांमधून पुन्हा एकदा संपूर्ण प्रेक्षकवर्ग हा नाटकाकडे वळवला.
प्रशांत दामले यांनी आतापर्यंत तीन दशकांहून अधिक काळ मालिका, चित्रपट आणि नाटक या क्षेत्रातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लाडका अभिनेता म्हणून जेवढा त्यांचा चाहतावर्ग आहे, तेवढाच त्यांच्या नाटकातील चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.
आतापर्यंत प्रशांत दामलेंच्या अनेक नाटकांचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. तर एकाच दिवशी तब्बल ५-५ प्रयोग त्यांनी केले आहेत. त्यांच्या नावी रंगकर्मी आणि अभिनेता म्हणून अनेक विक्रम आहेत. तर त्यात आज आणखी एक भर पडली आहे. प्रशांत दामले यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोठा सन्मान झाला आहे.
गुरुवार दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते अकादमी पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. त्यानिमित्त प्रशांत दामले यांना ‘संगीत-नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्कार’ मिळाला आहे. यामुळे मराठी रंगभूमी आणि नाटकवर्गासाठी हा प्रचंड अभिमानाचा क्षण ठरला आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना प्रशांत दामले यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले की, “हा खुप मोठ्ठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र आणि भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे.”
त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीतून आणि चाहतावर्गाकडून प्रशांत दामले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.