बॉलिवूडच्या फेमस दिग्दर्शकांच्या यादीत ‘रोहित शेट्टी’चे नाव आवर्जून घेतले जाते. सिम्बा, सिंघम यांसारखे अनेक हिट चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. रोहितने रुपेरी पडदा गाजवल्यानंतर आता ओटीटी गाजवण्यासाठीही सज्ज झाला आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला असून ट्रेलरमध्ये कलाकारांचा दमदार आणि डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. या सिरीजद्वारे चित्रपट निर्माता रोहित शेट्टी ओटीटीवर पदार्पण करणार आहे. रोहित शिट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या वेबसिरीजमध्येही प्रेक्षकांना भरपूर ॲक्शन पाहायला मिळणार आहे. तसेच या वेबसिरीजमध्ये मराठी कलाकारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
इंडियन पोलीस फोर्स या वेबसीरिजची कथा दिल्ली बॉम्बस्फोटापासून सुरु होते. हा बॉम्बस्फोट करणारे गुन्हेगार पोलिसांना हुलकावणी देत पळून जातात आणि नंतर पोलीस कशाप्रकारे गुन्हेगारांचा शोध घेतात, हे यातून उलगडणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय या तिघांनी सिरीजमध्ये पोलीसांची भूमिका साकारली असून ट्रेलरमध्ये शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे खूप वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. तसेच या सिरीजमध्ये मराठमोळ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. सुचित्रा बांदेकर, शरद केळकर आणि वैदेही परशुरामी हे सेलिब्रिटी सिरीजमध्ये झळकणार आहेत. दरम्यान, ही वेबसिरीज येत्या १९ जानेवारीपासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रसारित करण्यात येणार आहे. या सिरीजचा ट्रेलर तीन मिनिटांचा असून यामध्ये सिद्धार्थची धमकेदार ॲक्शन व जबरदस्त संवाद ऐकायला मिळत आहेत.
सिरीजमध्ये असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागल्या. तसेच चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. झिम्मा १ आणि झिम्मा २ या चित्रपटात त्यांनी वैशाली हे पात्र साकारले. त्यानंतर आता त्या इंडियन पोलीस फोर्स या हिंदी वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. त्यांच्या मुलाने म्हणजेच सोहम बांदेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत “सुचित्रा बांदेकर खूपच मस्त” असे लिहिले.
‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजच्या निमित्ताने रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे सध्या या सिरीजची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.