अगं बाई अरेच्चा आणि महाराष्ट्र शाहीर या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आलेले दिग्दर्शक म्हणजे ‘केदार शिंदे’. केदार शिंदे दिग्दर्शित नुकताच प्रदर्शित झालेला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा महाराष्ट्र आणि देशातच नाही तर संपूर्ण जगभरात तुफान गाजला.
या सिनेमाच्या भरघोस यशानंतर केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा‘ या सिनेमाची घोषणा केली. सिनेमाच्या घोषणेनंतर प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमुळे हा सिनेमा नक्की कसा असेल? या सिनेमाची स्टोरी काय असेल? या कडेच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले होते. त्यामुळे सर्वचजण सिनेमाचा ट्रेलर लाँच होण्याची वाट पाहत होते.
अखेर बहुप्रतीक्षित या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. नावावरुन जसे सर्वांनी तर्क लावले होते ते खरे ठरले. हा सिनेमा महिलांच्या आयुष्यावर आधारितच आहे. तर केदार शिंदे अगं बाई अरेच्चा नंतर पुन्हा एकदा महिलांच्या विषयावरील नवीन गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच आणि खासकरून महिलावर्गात फारच चर्चा सुरू आहे.
बाईपण भारी देवामध्ये सहा बहिणी ज्या आपापल्या संसारात मग्न झाल्या आहेत. त्या घराची, मुलांची आणि बाहेरच्या सर्वच गोष्टींची जबाबदारी पार पाडत असतात. मात्र त्यातून त्याही स्वतःसाठी जगायला विसरून जातात. पण आता त्या मंगळागौरच्या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन घरातल्यांना, बाहेरच्यांना तोडीस तोड उत्तर देत या स्पर्धेत भाग घेत स्वतःसाठी वेळ काढत आहेत. त्यामुळे त्या बहिणींमध्ये पुन्हा नव्याने नातं कसं फुलणार हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
हा सिनेमा जितका महिसंसाठी खास आहे तितकाच तो पुरुषवर्गाला देखील खूप काही सांगून जातो. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या भरभरून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सर्वांनी त्यांच्या या कथेचे आणि खासकरुन सिनेमातील एव्हरग्रीन अभिनेत्रींच्या पात्रांबद्दलही विशेष कौतुक केले आहे.
या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असून अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे देखील या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा येत्या ३० जूनला पाहण्यासाठी संपूर्ण प्रेक्षकवर्ग उत्सुक आहे.