मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी एकामागोमाग एक लग्नाचा घाटच घातला आहे. मागील काही दिवसांत आपल्या सर्वांचे अनेक लाडके कलाकार लग्नबंधनात अडकले. साऱ्यांचाच लग्नसोहळा एकदम धुमधडाक्यात पार पडला. त्यात आता आणखी एका जोडीची भर पडली आहे. ती म्हणजे अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodake) आणि तितीक्षा तावडे (Titeeksha Tawade). सिद्धार्थ आणि तितीक्षा यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला.
तितीक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत असून सिद्धार्थ नुकताच गुम है किसी के प्यार में या मालिकेत आणि दृश्यम २ या सिनेमात झळकला होता. तू अशी जवळी राहा या मालिकेत एकत्र काम केल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली, हळूहळू त्यांचं नातं फुलत गेलं. अन् त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. अनेक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण लग्नासाठी होकार मिळवताना सिद्धार्थने मात्र खूपच फिल्मी पद्धतीने मिळवला. सिद्धार्थच्या या प्रपोजलचा व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर त्या दोघांच्या ‘चाहूल कुणाची’ या गाण्याचा सुंदर व्हिडीओ समोर आला.
आणखी एक खास गोष्ट म्हणजे व्हिडीओ प्रदर्शित झाल्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी तितीक्षा आणि सिद्धार्थ यांनी साखरपुडा केला. साखरपुड्यासाठी तितीक्षाने फिकट जांभळ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती. या कार्यक्रमादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच त्यांचे काही रोमँटिक फोटो खूपच लक्षवेधी ठरले. त्यानंतर त्या दोघांचा हळदी समारंभ झाला. हळदीत तर सिद्धार्थने त्याच्या वडिलांसोबत केलेला डान्स तुफान व्हायरल झाला. तसेच त्याचा मित्रमंडळीसोबत घातलेला धुमाकूळ, मजा-मस्ती यामुळे हळदीला आणखी रंगत आली.
तितीक्षा आणि सिद्धार्थच्या या हळदी समारंभाला रसिका सुनील, खुशबू, संग्राम, अनघा अतुल, ऋतुजा बागवे यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. तर आता नुकतेच ते लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नाच्यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट आणि सोनेरी रंगाची नऊवारी साडी नेसली तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि सोनेरी रंगाचे धोतर नेसले होते.जेव्हा त्या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले तेव्हा तितीक्षा मात्र भावूक झाली. तिचा हा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला. त्यांचे लग्नाचे फोटो समोर येताच सिनेसृष्टीतून आणि त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.