तुळशीचं लग्न झालं की, संपूर्ण महाराष्ट्रात लगीनघाई सुरु होते. फक्त सर्वसामान्य माणसंच नाही, तर आपले लाडके कलाकार मंडळी देखील याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा तुळशीच्या लग्नानंतर अनेक कलाकारांच्या लग्नाची सरबत्तीच सुरु आहे. त्यात आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawade) आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodake) यांची देखील भर पडणार आहे.
View this post on Instagram
मागील काही महिन्यांपासून सिनेसृष्टीतील कलाकार एकामागोमाग एक लग्नगाठ बांधत आहेत. त्यात प्रसाद-अमृता, मुग्धा-प्रथमेश, पियुष-सुरुची, गौतमी, स्वानंदी, वनिता यांसारख्या अनेक कलाकारांची नावे आहेत. त्यात आता नुकतीच प्रथमेश परबची देखील भर पडली. त्यानंतर आता नुकतंच पूजा सावंतचं देखील संगीत कार्यक्रम पार पडला. तर लगेच त्या पाठोपाठ तितीक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नसमारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
लग्नाआधी केळवणाच्या अनेक कार्यक्रमानंतर आता नवरी आणि नवरदेव मोठ्या थाटामाटात लग्नाच्या तयारीला लागले आहेत. तितीक्षाने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये दिसले की, नुकतीच तिने हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी काढली. तर दुसरीकडे अभिनेत्री अनघा अतुल हिने सिद्धार्थसोबतचा व्हिडीओ शेअर केला; त्यात तिने लिहिले की, “वऱ्हाड निघालंय बरं का!” तर यावर तिने “मेरे यार की शादी है” हे गाणं देखील लावलं. त्यामुळे आता लग्नघटिका समीप आली असं म्हणायला हरकत नाही.
तितीक्षा आणि सिद्धार्थ मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तर काही दिवसांपूर्वी म्हणजेच ८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. सारेचजण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आज (२५ फेब्रुवारी २०२४) तितीक्षा आणि सिद्धार्थचा साखरपुडा पार पडला. त्या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो अचानक समोर येताच त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला. त्यांच्या या साखरपुड्याला त्यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
View this post on Instagram
साखरपुड्यासाठी तितीक्षाने फिकट जांभळ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती. हातावर सुंदर मेहंदी, कपाळी नाजुकशी टिकली केसांत माळलेल्या सुंदर फुलामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती. त्या दोघांचा हा साज सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारा होता. तितीक्षा आणि सिद्धार्थचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सिनेसृष्टीतून आणि त्यांच्या चाहत्यांकडून त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच फोटोवर कमेंट करत सारेजण त्यांना लग्न कधी होणार? असा प्रश्न विचारत आहेत.
लग्नाची तारीख घोषित नसली तरी तितीक्षा आणि सिद्धार्थ २६ फेब्रुवारी २०२४ म्हणजे उद्याच लग्नगाठ बांधणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा : दुबईत हे काम करतात सोनाली कुलकर्णीचे अहो; पहिल्यांदाच केला खुलासा