आजवर बऱ्याच सिनेमांच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास दाखवण्यात आला. परंतू दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’च्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात स्वराज्यासाठी प्राण वाहिलेल्या मावळ्यांचा इतिहास देखील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. तसेच आत्ता दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात या सिनेमाची घोषणा करण्यात आली. तर काही दिवसांपूर्वी सिनेमाचं मोशन पोस्टरही शेअर करण्यात आलं. सिनेमा प्रदर्शित व्हायला आणखी बराच वेळ असला तरी, या सिनेमानं इतिहास रचला आहे.
धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे भोसले या व्यक्तिमत्वाने सध्या मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीला देखील भुरळ घातली आहे. आजवर मालिकेद्वारे घरोघरी पोहचलेले शंभुराजे लवकरच रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली असून चित्रपटातील गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. तर पार्श्वसंगीत हे अमर मोहिले यांचे आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल.
फक्त तरुण पिढीच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्ग सध्या ऐतिहासिक सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सिनेमागृहाकडे वळले आहेत. त्याचं कारण म्हणजे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात. ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एका अभिनेत्याची झलक देखील पाहायला मिळत आहे. तसेच पोस्टरमधील अभिनेत्याच रौद्र रुप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पोस्टर रिलीज झाल्यामुळे ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार? याची चाहत्यांना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी पोस्टर शेअर करत लिहिले की, “गर्जतो आमच्या देही.. रक्त बिंदू रक्त बिंदू.. राजे आले आमचे.. आले रौद्र शंभू रौद्र शंभू.” या पोस्टवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? विशाल निकम, वैभव तत्त्वादी, जय शिवराय, जय शंभूराजे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. परंतू या सिनेमात विशाल झळकणार असा अनेकांचा अंदाज आहे, त्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर विशाल करत असलेल्या निरनिराळ्या अनेक पोस्ट ऐतिहासिक आणि धार्मिक आहेत. परंतू शिवरायांचा छावा या सिनेमात नक्की कोण भूमिका साकारणार याकडे मात्र साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.
येत्या १६ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची असलेली उत्सुकता न संपणारी आहे. तसेच एकीकडे विकी कौशल संभाजी महाराजांच्या रूपात हिंदी सिनेमातून जगभरात पोहोचणार आहे, तर दुसरीकडे दिग्दर्शक दिग्पाल यांच्या नजरेतून शंभुराजे मराठी रासिकांसमोर येणार आहेत.