अभिनेत्री राधिका आपटे ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिच्या बोल्ड लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तिने आतापर्यंत ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये काम केले, तसेच ‘अंधाधुन’, ‘फोबिया’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये तिने आपली छाप पाडली. अलीकडेच ती ‘विक्रम वेधा’ चित्रपटात सैफ अली खानसोबत झळकली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने तिच्या लग्नावर भाष्य केले. राधिकाने २०१२ साली ब्रिटीश म्यूझिशियन बेनेडिक्ट टेलरशी लग्न केल. ते दोघे २०२० पर्यंत जवळजवळ ८ वर्ष लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. राधिका आता तिचा जास्तीत जास्त वेळ लंडन मध्ये घालवते, ‘विक्रम वेधा’च्या प्रमोशनसाठी ती सध्या भारतात परतली होती.
प्रमोशनच्या निमित्ताने ती तिच्या खाजगी आयुष्यावर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाली की, “लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप खूपच कठीण आहे. आम्ही दोघांनीही या नात्यासाठी मार्ग शोधला, जेणेकरून ते टिकून राहील. जेव्हा कोविडची लाट आली, त्या काळापर्यंत मी लॉन्ग डिस्टन्स लग्नाच्या नात्यात होतो. आता आम्ही एकमेकांना बराच वेळ देत आहोत. हा आमच्या लग्नाचा दुसरा चॅप्टर आहे. सुरुवातीला एकामेकांपासून दूर राहणं खूप वेदनादायी होतं. आता मला वाटतं की त्याच्यापासून एक क्षणही दूर राहणं मला शक्य नाही. कारण हे खूपच वेदनादायी आहे. आता आम्ही एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो.”
राधिका पुढे म्हणाली, “अशाप्रकारचं नातं सांभाळणं खूपच कठीण असतं. पण जर तुम्ही यावर काम केलं तर तुम्ही सर्व चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता. आम्ही हेच केलं. पण आम्ही हे सगळं कसं केलं हे मला माहीत नाही. आम्हाला एकमेकांना वेळ देणं आवडत होतं. कधी कधी तुम्हाला एकमेकांना मोकळं सोडावं लागतं अशा नात्यासाठी, जे तुम्हाला हवं आहे. जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा आणि समोरच्या व्यक्तीलाही स्वीकारा. हेच मी एका यशस्वी नात्यातून शिकले.”