दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच ‘त्रिशा कृष्णन’ (Trisha Krishnan). गेल्या दोन दशकांपासून त्रिशाने सिनेसृष्टीला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्रिशाने अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. आजवर तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
त्रिशा सतत कोणत्या न कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. पण आत्ता मात्र ती एका वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे. साऊथमधील सर्वाधिक पॉप्युलर आणि मानधन घेणारी अभिनेत्री म्हणूनही त्रिशाला ओळखले जाते. जवळपास १३ वर्षांनी त्रिशा सिनेसृष्टीत कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगली आहे. १३ वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील २०१० मध्ये प्रियदर्शन निर्मित ‘खट्टा – मीठा’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्रिशा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत होती. तिचा हा सिनेमा राजकीय विषयावर आधारित होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये कोणताच सिनेमा केला नाही. आता तब्बल १३ वर्षांनी ती बॉलिवूडमध्ये परतणार असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी त्रिशा एका वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावरचर्चेत आली होती. त्रिशाचा व विजय थलापथीचा ‘लिओ’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई केली. मात्र काही दिवसांपूर्वी हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला. त्याचं कारण म्हणजे सिनेमात अभिनेता मन्सूर अली खानने त्याची सहकलाकार त्रिशा कृष्णन हिच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्रिशानं थेट कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानं देखील मन्सूरला चांगलेच फटकारले आणि या सगळ्यात त्रिशाची मन्सुरनेही माफी मागीतल्याचे वूत्त समोर आले.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झालेच तर ती सध्याच्या घडीला दाक्षिणात्य सिनेमांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्रिशा विष्णु वर्धर यांच्या पुढील सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमामध्ये ती सलमान खान सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या सिनेमाबद्दल अजून कोणतीही बाब समोर आलेली नाही, मात्र लवकरच सिनेमाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सध्या ती विदामुयार्ची या तमिळ आणि आयडेंटिटी या मल्याळम भाषेतील सिनेमाचे त्रिशा शूट करत आहे.