रुपेरी पडद्यावरील सिनेमे जेवढे हीट होतात त्याच प्रमाणात छोट्या पडद्यावरील मालिकाही प्रचंड हीट होतात. आजपर्यंत अनेक मालिकांना भरघोस लोकप्रियता लाभली आहे. त्यापैकी एक मालिका म्हणजे “तू तू मैं मैं”. ९०च्या दशकातील ही मालिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.
१९९४ साली या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या मालिकेमध्ये सासू-सुनेची लुटूपुटूची भांडणे आणि सासू सुनेचे आंबट गोड नातं या मालिकेतून पाहायला मिळाले. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या मालिकेमध्ये मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्री झळकल्या होत्या. सुप्रिया पिळगावकर यांनी या मालिकेत सुनेची तर रीमा लागू यांनी सासूची भूमिका साकारली होती.
हे देखील वाचा: ‘आदिपुरुष’ च्या सेटवर देवदत्त नागेला मिळाली अशी वागणूक
या दमदार अभिनेत्रींमुळे या मालिकेत आणखीनच रंगत आली होती. त्यामुळे ही मालिका संपूच नये असे कित्येकांना वाटत होते. पण आता इतक्या वर्षांनंतर त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण “तू तू मैं मैं” या मालिकेचा पुढील भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या मालिकेचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केले होते. तर आता त्यांनीच या मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल खुलासा केला आहे.
मालिकेचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “या मालिकेला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याची मी तयारी करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात सुप्रिया सुनेची भूमिका साकारत होती, तर आता या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये ती सासूच्या भूमिकेत दिसेल.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आताची तरुण पिढी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा शाळेत होती. ही पिढी मालिका पाहत लहानाची मोठी झाली आहे. त्या वेळी रीमा लागू यांचं हिंदी मनोरंजनसृष्टीतही मोठं नावं होतं, तर सुप्रिया हिंदी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवी होती. पण मालिका सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या काळातच प्रेक्षकांनी या दोघींनाही अक्षरशः डोक्यावर घेतलं.”
“तू तू मैं मैं” या मालिकेचा पुढील भाग टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.