जसं मागील काही वर्षांत कोरोनाकाळ होऊन गेला, तसाच आता सध्या भारतभर श्रीरामाचा काळ सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. देशभरात रामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
२२ जानेवारी हा दिवस खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण याच दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापणा होणार असून अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामभक्तांची इच्छा पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरात दिवाळी साजरी होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. तर या सोहळ्याला देशातील अनेक स्तरातील लोकांनी स्वतःच्या परीने हातभार लावत सहभाग घेत आहेत.
तसेच भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील सिनेमा, मालिका किंवा सोशल मीडियावर पोस्ट यांच्या माध्यमातून या सोहळ्याचा उत्साह आणखी वाढवताना दिसत आहेत. त्यातच आता सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) आणि गायिका आर्या आंबेकर (Aarya Ambekar) यांची. या दोघांनीही आजवर आपल्या सुरेल आवाजातून कायमच आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. तर आता अयोध्यात होणार असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापणेचे निमित्त साधत एक नवं गाणं गायले. हे नवं गाणं हिंदी भाषेतील असून त्याचे बोल म्हणजेच गाण्याचे नाव असे आहे की, ‘हृदय में श्रीराम है.’
सुप्रसिद्ध गायक व संगीतकार सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी ‘हृदय में श्रीराम है’ हे गाणं संगीतबद्ध केले. या ऐतिहासिक ठरणाऱ्या सोहळ्याचे निमित्त साधत आपल्या या मराठमोळ्या कलाकारांनी हे गाणं श्रीरामाला समर्पित करत राम भक्तांसाठी घेऊन आले आहेत. त्यांच्या या नव्या गाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच हे गाणं देशवासीयांच्या देखील पसंतीस उतरले. इतकेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या गाण्याची आणि या कलाकारांची दखल घेत कौतुकही केले. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून आला हे नक्की.
नरेंद्र मोदी यांनी कलाकारांचे कौतुक करताना हृदय में श्रीराम है या गाण्याची लिंक शेअर करत सोशल मीडियावर लिहिले की, “अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण देश रामाच्या भक्तीत लीन झाला आहे. लोकांची हीच भावना सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी आपल्या सुमधुर सुरातून दर्शवली आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे आपल्या कलाकारांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचे खूपच खास शब्दांत आभार मानले. या गाण्यासंबंधित भावना व्यक्त करत संगीतकार सलील कुलकर्णी यांनी लिहिले की, “आपल्या गाण्याची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दखल घेणं आणि कौतुक करणं …..हा खूप खूप समाधानाचा क्षण. जय श्रीराम.” तर गायक सुरेश वाडकर यांनी लिहिले की, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्री राम यांना समर्पित आमचे भजन शेअर केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुमच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राण-प्रतिष्ठा महोत्सवासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. जो प्रत्येकाच्या जीवनातील एक दिव्य, अविस्मरणीय आणि अद्वितीय आणि पवित्र क्षण बनेल. जय जय श्री राम! देवा सियावर रामचंद्राचा जय!”
हे कौतुक पाहून भावूक झालेल्या आर्या आंबेकर हिने पोस्ट करत लिहिले की, “जय श्रीराम. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि त्यांच्या कामाची एक प्रामाणिक चाहती असताना त्यांची ही पोस्ट पाहून माझे डोळे पाणावले आहेत. मी शब्दात सांगू शकत नाही पण इतका आनंद मला याआधी कधीच झाला नसेल. आमचा हा खारीचा वाटा,ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्यापर्यंत पोचला, अशी भावना मनात निर्माण झाली.”
तसेच तिने पुढे लिहिले की, “प्रिय मोदीजी, तुमचे मनापासून आभार, २२ जानेवारी हा महत्वाचा दिवस आपण साजरा करत आहोत. त्यासाठी आमचा जो हा खारीचा वाटा आहे याची तुम्ही दखल घेतलीत. देशसेवेसाठी आम्ही नेहमीच गाण्याच्या माध्यमातून तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवत काम करण्याचा प्रयत्न करु. तुमचा प्रचंड आदर करते आणि तुमचा आशीर्वाद घेते.”
मराठी कलाकारांची ही कलाकृती खरंच फारच कौतुकास्पद आहे. त्यामुळे भारतभरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.