मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ. अशोक सराफ यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात मराठी सिनेसृष्टीला असंख्य सुपरहिट सिनेमे दिले.
मागील वर्षीच अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तरी गाठली. त्यांना नुकताच २०२३ चा जीवन गौरव पुरस्कारही मिळाला. ७६ वायात सुध्दा प्रेक्षकांना अशोक सराफ म्हणजे सर्वांचे लाडके अशोक मामा पडद्यावर दिसावे ही इच्छा कायम आहे. एवढेच नाही तर अशोक सराफही त्यासाठी तयार आहेत. परंतू त्यांना आवडेल अशी एकही कथा त्यांच्या समोर येत नाही.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा असलेल्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा‘ या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींसोबत अशोक सराफही उपस्थित होते. त्यावेळी त्यांना सध्या मराठी सिनेमांमध्ये काम न करण्यामागचे कारण विचारले असता, विनोदी कथा लिहिणारे लेखकच नाहीत अशी खंत व्यक्त करीत अगदी स्पष्टपणे उत्तर दिले.
तेव्हा अशोक सराफ म्हणाले की, “सध्या मी चित्रपट करत नाही. कारण एखादी कथा मला लिहून देणारा कोणी लेखकच नाही. विनोदवीर म्हणून मला ओळखलं जातं. सगळ्यांच्या नजरेत मी फक्त विनोदवीर आहे. पण इतरही भूमिका मी करू शकतो हे त्यांना माहित नाही. किंवा मी वेगळ्या भूमिका करु शकतो याची त्यांना खात्री वाटत नाही. त्यामुळे कुणीही मला इतर भूमिकांसाठी विचारत नाही. फक्त विनोदवीर म्हणूनच माझा विचार करतात.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “माझ्या वयाची आणि माझ्या स्टाइलची विनोदी कथा लिहिणारा लेखक तरी कोण आहे?. माझ्या स्टाइलची कथा लिहिणार लेखक कोणीही नाही याचीच मला मोठी खंत वाटते. विनोदी कथा समोर का नाही येत? आणि जे विनोदी कथा लिहितात त्याला कॉमेडी म्हणायचं म्हणजे आपण स्वतःला फसवण्यासारखं आहे. त्यामुळे मी सध्या काही करत नाही. माझ्याकडे कथा येतात. पण मी वाचतो आणि त्यांना नकार कळवतो. कारण मला ते काम करावसं वाटत नाही.”
“मला जर ती कथा वाचून काम करावसं वाटेल तरच मी ते करणार. जी कथा मला पटत नाही ते काम मी करत नाही. जर कोणी चांगली कथा माझ्याकडे आणली तरच मी काम करेन. माझ्या वयाचा विनोद आताचे लेखक लिहू शकणार नाहीत. मला आता हिरो, हिरोच्या मित्राची भूमिका नाही मिळणार. फक्त आता मला वडिलांच्या भूमिका साकारायला मिळणार. आणि कुठला बाप कॉमेडी असतो? एक वेळ होती की, ज्यामध्ये वडील कॉमेडी दाखवायचे. पण आता तसं घडत नाही. मुळातच तसं लिहिणारं कोणी नाही. त्यामुळे काही होऊ शकत नाही.”
मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक गाजलेल्या ‘वेड’मध्ये देखील अशोक सराफ झळकले होते. तसेच ते सध्या नाटक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.