मराठी कलाविश्वातील नावाजलेले अभिनेते ‘अशोक शिंदे’ हे भारतीय चित्रपट आणि नाटकांमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. त्यांनी आजपर्यंत तब्बल १७० चित्रपटात काम केले. कधी नायक तर कधी खलनायक बनून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्यं केले आहे.
अशोक शिंदे हे मुळचे पुण्याचे असल्यामुळे त्यांच्या गणपती बाप्पाबद्दलच्या आठवणी अगदीच खास आहेत. त्याचे बालपण देखील पुण्यातच गेले. सध्या सर्वत्रचं बाप्पाच्या आगमनाची जल्लोष तयारी सुरु आहे. तसेच आपले मराठी कलाकार देखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येकजण बाप्पासोबतचे काही ना काही खास क्षण सोशल मीडियावरून शेअर करत आहेत.
अशोक शिंदे यांनी नुकताच त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. “गणेशोत्सव हा सण माझ्यासाठी खूपच खास आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अनेकजण बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्ती बनवताना आपण बघतो. बाप्पाची मूर्ती नेमकी कशी घडवली जाते हे जाणून घेण्याची उत्सुकता लहानपणी सर्वांनाच असते. यशस्वी कामाची सुरुवात देखील आपण बाप्पाच्या आशीर्वादानेच करतो.” असे त्यांचे म्हणणे आहे.
बालपणी गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात चित्रकला स्पर्धा व्हायची. यात अशोक शिंदे नेहमी सहभागी व्हायचे. केवळ सहभागच नाही, तर त्यांनी सलग ३ वेळा प्रथम क्रमांक देखील पटकावला होता. ही कला त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली असल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितले.
लहानपणापासून त्यांच्या मनात अनेकवेळा मूर्ती घडवण्याचा विचार देखीलयेत असत. अवघ्या १० वर्षाचे असताना त्यांनी मूर्ती घडवण्याचा एक सुंदर प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी घरच्यांच्या नकळत शाडूची माती आणली व ते लपून-छपून मूर्ती घडवत असतं. गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ती घाबरतच आईला दाखवली.
त्यांनी बनवलेली छोटीशी बालमूर्ती त्यांच्या आई-बाबांना देखील फारच आवडली. तेव्हा अशोक यांच्या आई वडिलांनी मूर्तीला रंग देण्यास सांगितले व मूर्ती पूर्ण झाल्यावर गणेश चतुर्थीला राहत्या अगदी थाटामाटात मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन होऊ लागलं.