मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. नाटक, मालिका, सिनेमा जर केदार शिंदे दिग्दर्शित असेल तर अगदी सहजच प्रत्येकाच्या नजरा त्याकडे लागून राहतात. केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर‘ हा सिनेमा येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महाराष्ट्र शाहीरमध्ये शाहीर साबळे ही प्रमुख भूमिका अभिनेता अंकुश चौधरी याने साकारली आहे. तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे ही सुध्दा प्रमुख भूमिकेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा सिनेमा प्रचंड गाजतोय. तसेच या सिनेमातील ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्याने मात्र प्रत्येकालाच वेड लावले आहे.
बहरला हा मधुमास नवा याच गाण्यावर कमेंट करीत एका नेटकऱ्याने सनाची खिल्ली उडविली. त्याने लिहिले की, “अरे ही तर साडी नेसलेले केदार शिंदेच वाटतात” आणि ही कमेंट केदार शिंदे यांनी पाहिली. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. यादरम्यान त्यांनी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना मिश्किलपणे शब्दांचा चाप दिला आहे.
केदार शिंदे म्हणाले की, “ही प्रतिक्रिया पाहून आम्ही दोघंही खूप हसलो होतो. अर्थात ती माझीच मुलगी आहे त्यामुळे ती माझ्यासारखीच दिसणार ना. मी त्या कमेंट करणाऱ्याकडे बघत होतो की तो त्याच्या आईवडिलांसारखाच दिसत असावा की कुठेतरी गफलत झाली की काय? पण एक मात्र नक्की की सगळ्यांनी सनाला स्वीकारलंय. बहरला हा मधुमास या गाण्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे.”
तसेच सनाच्या करियरबद्दल बोलताना म्हणाले की, “सनाने खूप चांगलं काम केलंय, बऱ्याचदा तिने माझा ओरडा सुद्धा खाल्लाय. पण रात्री जेव्हा आम्ही निवांत बसायचो तेव्हा मी तिच्या कामाबद्दल इथे छान सीन जमला असं म्हणायचो. सनाने माझ्यासोबत असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं होतं. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून बाबा कसे आहेत हे तिला चांगलंच ठाऊक होतं.”
तर आता महाराष्ट्र शाहीर हा बहुचर्चित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र आतुर झाले आहेत.