भारतीय सिनेसृष्टीत मालिका आणि सिनेमांची सरबत्ती कायमच सुरु असते. पण, त्याचसोबत वेगवेगळ्या रिअॅलिटी शोची देखील चांगलीच लोकप्रियता वाढली आहे. मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांतील अनेक रिअॅलिटी शो कायमच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यापैकीच एक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘झलक दिखला जा.’ नुकताच या शोचा ११ वा सिझन पार पडला.
मागील काही दिवसांपासून झलक दिखला जाच्या ११ व्या पर्वाने साऱ्यांचेच मन जिंकले. या पर्वाच्या सुरुवातीला आपला मराठमोळा कलाकार शिव ठाकरे देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तसेच संगीता फोगाट, श्रीराम चंद्रा, तनीषा मुखर्जी, अंजली आनंद, राजीव ठाकूर, करुणा पांडे, उर्वशी ढोलकिया आणि आमिर अली बतौरसह अनेक स्पर्धक या ११ व्या पर्वात सहभागी झाले होते. सर्वांनीच पराकाष्टा करून अंतिम पर्यंत टिकून राहणायचा प्रयत्न केला पण यात फक्त मनीषा रानी, शोएब इब्राहिम, श्रीराम चंद्रा, अद्रिजा सिन्हा आणि धनश्री वर्मा यांनाच टाॅप ५ स्पर्धकांच्या यादीत स्वतःचे नाव लिहिता आले.
यापैकी मनीषा रानी हिने झलक दिखला जाच्या ११ व्या पर्वाच्या विजेत्यापदावर नाव कोरले आहे. मनीषा रानी बिग बॉस OTT च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आली. तसेच ती या रिअॅलिटी शोची थर्ड रनरअपसुद्धा ठरली होती. बिग बॉस नंतर आता पुन्हा रिअॅलिटी शो करत ती नुकतीच झळकली ते ‘झलक दिखला जा’च्या ११ व्या सिझनमध्ये. आपल्या डान्सच्या जादूने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बिग बॉसवेळी अगदी काही पावलांवरून विजेतेपद जरी हुकले असले तरी यावेळी मात्र तिने या संधीचं सोनं केलं.
झलक दिखला जाचे विजेतेपद पटकावल्यावर मनीषाला ट्रॉफीसह तब्बल ३० लाख रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून मिळाला. तसेच या संपूर्ण पर्वात मनीषाच्या डान्सच्या प्रत्येक ठोक्यावर मार्गदर्शक लाभलेल्या कोरिओग्राफर आशुतोष पवार याला देखील १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तसेच मनीषा आणि आशुतोष यांना दुबईजवळील एका बेटावरच्या ट्रीपचे पॅकेज देखील मिळाले आहे. झलक दिखला जाच्या ११ व्या पर्वाच्या परिक्षणाची धुरा मलायका अरोरा, फराह खान आणि अरशद वारसी यांच्याकडे होती. तर ऋत्विक धनजानी आणि गौहर खान यांनी हा शो होस्ट केला.
झलक दिखला जाच्या विजेत्यापदावर नाव कोरल्यानंतर मनीषाने पहिली पोस्ट केली. तेव्हा तिने लिहिले की, “स्वप्ने खरी होतात. आज तुम्हा सर्वांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहेत. बिहारच्या एका छोट्या गावातल्या एका मुलीनं मोठी स्वप्ने पाहिली आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारत एकत्र आला. झलकच्या प्रवासात ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं आणि ट्रॉफीही दिली त्या सर्वांचे आभार,खूप आनंदी होत आहे.” मनीषाची ही पोस्ट आणि तिचा हा विजय सध्या सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.
तसेच सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून सारेजण तिला शुभेच्छा देत आहेत.