कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे उत्तम कलाकार असण्यासोबतच एक प्रसिद्ध व्यावसायिक देखील आहेत. कलाकार हे चित्रपटांमधून मोठी कमाई करताना दिसतात. इतकेच नाही तर फक्त चित्रपटच नव्हे तर कलाकार हे त्याचे पैसे इतर व्यवसायांमध्येही गुंतवणूक करताना दिसतात. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपआपले व्यवसाय सुरु केले आहेत.
त्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनघा अतुल, हर्षदा खानविलकर, सुकन्या मोने, अक्षया नाईक, अभिद्या भावे, प्रार्थना बेहेरे अशा असंख्य कलाकारांनी गेल्या काही दिवसांमध्ये व्यवसाय क्षेत्रात एक नवी भरारी घेतली आहे. तसेच ‘चला हवा येऊ द्या’ या रिअॅलिटी शोमधील सर्वांची आवडती श्रेया बुगडे हिने शुक्रवारी २६ जानेवारी रोजी ‘बिग फिश’ या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले.
तसेच श्रेया बुगडेच्या पाठोपाठच चला हवा येऊ द्यामधील संगीत दिग्दर्शक तुषार देवल याने देखील व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केले आहे. तुषार देवल आणि स्वाती देवल हे दाम्पत्य गेली अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. नुकत्याच एका मिसळ मोहोत्सवात त्यांनीही त्यांचा मिसळचा एक स्टॉल उभा केला. त्यांच्या या मिसळ स्टॉलला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून भविष्यात जरी ते बिजनेस म्हणून या व्यवसायाकडे वळले तर कोणालाच नवल वाटणार नाही. चला हवा येऊ द्या प्रमाणेच त्यांच्या या स्टॉलचे नाव ठेवण्यात आले आहे चला मिसळ खाऊ या.
तसेच या मिसळ स्टॉलबद्दल स्वाती आणि तुषार ने सांगितले की, “आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आहे. पण अगोदरचा व्यवसाय आम्ही सोडलेला नाही, तो उत्तमच चालू आहे. पण आजची खासियत अशी आहे की आम्ही बोरीवली पूर्वमध्ये अभिनव नगर येथे भव्य मिसळ महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात आम्ही आमच्या मिसळचा स्टॉल लावलेला आहे. याशिवाय आम्ही एका खास प्रकारचे एक सरबत आमच्या ग्राहकांसाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे खायची आणि प्यायची अशी दोन्हींची सोय आमच्याकडे करण्यात आलेली आहे. ”
View this post on Instagram
बोरीवली पूर्वमध्ये होणाऱ्या या मिसळ स्टॉलला राज ठाकरे यांनी देखील भेट दिली. तुषार देवलने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “राज ठाकरे यांना जवळून पाहता आले, तसेच त्यांनी पाठीवरून हात ठेवून आशीर्वाद देत खास शुभेच्छा देखील दिल्या.”
स्वाती आणि तुषार देवल यांच्या ह्या नवीन व्यवसायाला नुकतीच सुरुवात झाली असून २६ जानेवारी रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला. सलग तीन दिवस म्हणजेच २८ जानेवारी पर्यंत खवय्यांना इथल्या मिसळ मोहोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे. यानिमित्त चाहत्यांना आपल्या लाडक्या कलाकारांच्या हातची चव देखील चाखायला मिळणार आहे.