बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून ती सिनेसृष्टीपासून देखील दूर आहे. त्यामुळे त्याचं खरं कारण काय? असा अनेकांना प्रश्न पडला. पण विराट आणि अनुष्का यांनी त्यावर काहीच खुलासा केला नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने सध्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यामधून नाव मागे घेतल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. काहींनी त्याच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने सुट्टी घेतली आहे, असं सांगितलं तर काहींनी अनुष्का आई होणार असल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी अनुष्का गरोदर असल्याचा अंदाज काहींनी बांधला. मात्र अनुष्का किंवा विराट दोघांनी यावर मौन बाळगले. मात्र आता सगळ्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा आई–वडील होणार असल्याचं आता समोर आलं आहे. विराटचा अगदी जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने या बातमीवर शिक्कामोर्तब केले.
काही महिन्यांपूर्वी अनुष्का आणि विराट हे बंगळूरमधील एका हॉटेलमध्ये स्पॉट झाले. या हॉटेलमधील विराट आणि अनुष्का यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावेळी अनुष्का तिच्या ओढणीने बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा कमेंट नेटकऱ्यांनी त्या व्हिडीओवर केल्या. तसेच या दोघांना काही दिवसांपूर्वी मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर देखील स्पॉट केले. पण त्यांनी विनंती केली, की त्यांचे फोटो कुठेच टाकू नका आम्ही योग्य वेळ आल्यावर स्वतः मीडियासमोर येऊन सगळ सांगू. या विनंतीला मान देऊन मीडियाने देखील त्यांचे फोटो व्हायरल केले नाहीत.
View this post on Instagram
एबी डिव्हिलियर्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. विराटसाठी कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. त्याने योग्य निर्णय घेतला आहे.” २०१७ मध्ये विराटने अनुष्कासोबत लग्नगाठ बांधली. जानेवारी २०२१ मध्ये विराट आणि अनुष्काने त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव वामिका असे ठेवले. तर आता ते लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत.
कामाबद्दल सांगायचे तर लवकरच अनुष्काचा ‘चकदा एक्स्प्रेस’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनुष्का मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा सिनेमा भारतीय महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे.