मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या काळातील आघाडीचा आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे ‘सिध्दार्थ चांदेकर.’ सिध्दार्थची चॉकलेट बॉय अशी देखील ओळख आहे. सिध्दार्थ हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. तो सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रीय असतो. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्यातील छोटी गोष्ट तो चाहत्यांसोबत शेअर करतो.
मागील वर्षी सिध्दार्थने त्याच्या आईचे दुसऱ्यांदा लग्न लावून दिले. यावेळी अनेकांनी त्याचे कौतुक केले, पण काहींनी मात्र त्याला प्रचंड ट्रोल देखील केले. अनेकांनी त्याला आईचं लग्न कोण लावून देत? असं विचारलं होतं. मात्र सिध्दार्थला त्याच्या आईच्या आनंदापुढे काहीच मोठं नव्हतं. सिध्दार्थची आई म्हणजेच ‘सीमा चांदेकर’ या देखील एक उत्तम आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या दोघांनी ‘जिवलगा’ या मालिकेत एकत्र काम देखील केले होते. सिध्दार्थ त्याच्या नावापुढे देखील आईचेच नाव लावतो.
सिध्दार्थला एक मोठी बहिण सुद्धा आहे. सिध्दार्थ आणि त्याची बहिण म्हणजेच सुमेधा या दोघांचा सांभाळ त्याच्या आईने म्हणजेच सीमा यांनी एकट्याने केला. सिध्दार्थचे वडील तो लहान असतानाच त्याच्या आईला सोडून गेले होते. तेव्हापासून त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीने घराचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतला. सिध्दार्थने देखील वयाच्या ७ व्या वर्षापासून मराठी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली.
नुकतंच एका मुलाखती दरम्यान सिध्दार्थने त्याच्या वडिलांबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्याला वडीलांबद्द्ल विचारलं असता तो म्हणाला, “लहाणपणापासूनच वडिलांची माया नव्हती. कारण ते आजूबाजूलाच नव्हते. जर आपल्याला माहीत असेल की, आपले वडील या जगातच नाही तर आपण पुढचं आयुष्य शांततेत काढू शकतो. पण मला माहीत आहे की माझे वडील आहेत फक्त मला माहीत नाही की ते कुठे आहेत आणि मला अजूनही माहीत नाही की ते कुठे आहेत? ही एक फार विचित्र परिस्थिती आहे. मला लहाणपणापासून असं मधल्या मधे अडकल्यासारखं वाटायचं. नंतर मला जाणीव झाली की, माझे वडील आजूबाजूला नाहीत या विचारात मी इतका अडकलोय की, माझी आई आणि बहीण २४ तास माझ्या आजूबाजूला आहेत. सतत माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडे माझं लक्षच नाही.”
यावेळी सिध्दार्थ असंही म्हणाला की, “माझ्या आईमुळे आणि माझ्या बहिणीमुळे मला वडिलांची उणीव कधीच भासली नाही.” तर यावेळी पहिल्यांदाच सिद्धार्थ वडिलांबद्दल व्यक्त झाला.