मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. २०१६ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘सैराट’ प्रदर्शित झाला अन् मराठी सिनेसृष्टीने संपूर्ण जगभरात ताबा मिळवला.
निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ते आता एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. पण यावेळी कोणतीही लव्हस्टोरी नसून एका व्यक्तीचा बयोपिक प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत.
नागराज मंजुळे नेहमी वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. यावेळी ते पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करणार आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात या चित्रपटाची घोषणा केली आहे. असा विषय निवडल्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड खूश आहेत.
कुस्तीच माहेरघर समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. या उत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमात नागराज मंजुळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली.
पैलवान खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये भारताला ऑलम्पिक मेडल मिळवून दिले होते. तसेच या कुस्तीपटूने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं नाव गाजवल होतं. तर त्यांचं आयुष्य आता रुपेरी पडद्यावर दिसणार असल्यामुळे नागराज मंजुळे यांच सध्या सर्वत्रच कौतुक होत आहे.
तर हा चित्रपट कोणत्या नावाने प्रदर्शित होणार आणि कधी प्रदर्शित होणार याचीच सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.