मराठी सिनेसृष्टी कायम एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकार कायमच तत्पर असतात. यासाठी केवळ पडद्यावरील कलाकारच नाही तर पडद्यामागील कलाकार देखील प्रचंड मेहनत घेत असतात. शेवटी काय तर त्यांची कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी हाच काय तो हेतू.
त्यामुळे काहीजण नवा कोरा विषय घेऊन सिनेमा बनवतात, तर काही जुनाच विषय घेऊन नवा दृष्टीकोन आपल्या सर्वांसमोर ठेवत असतात. तर आता पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. तो सिनेमा म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा.’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीतील प्रचंड मोठा काळ गाजवला. २००४ साली प्रदर्शित झालेला नवरा माझा नवसाचा या सिनेमातील गाणी, एकूण एक डायलॉग आणि संपूर्ण सिनेमाच प्रेक्षकांच्या हृदयावर कोरला गेला आहे.
View this post on Instagram
२० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे वेड आजही प्रेक्षकांना अगदी जसेच्या तसेच आहे. त्यामुळे आजही टेलेव्हिजनवर जेव्हा हा सिनेमा लागतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब आवडीने हा सिनेमा पाहतात. २० वर्षांपूर्वी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाच, हे आपण जाणतोच. तर तोच धुमाकूळ घालायला नवा नवस, नवा प्रवास घेऊन ‘नवरा माझा नवसाचा २’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी २ दिवसांपूर्वी या सिनेमाच्या क्लॅपर बोर्डचा फोटो शेअर करत या आगामी सिनेमाची बातमी सर्वांना दिली. त्यावरून नवरा माझा नवसाचा २ या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मितीचे काम सचिन पिळगांवकर यांच्या हाती आहे.
जयवंत वाडकर यांच्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी सचिनजी यांनी देखील गणपती बाप्पाच्या मंदिरातील सिनेमाच्या नावाचा मोशन व्हिडीओ शेअर करत सिनेमाच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यामुळे सध्या मराठी रसिक प्रेक्षक भलतेच खुश आहेत. २००४ सालच्या नवरा माझा नवसाचा या सिनेमात सचिन पिळगांवकर सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जॉनी लिव्हर, वैभव मांगले, अतुल परचुरे, जयंत वाडकर, मधुराणी प्रभुलकर, सोनू निगम, अली असगर, कुलदीप प्रधान, विजय पटवर्धन, सुनिल तावडे, प्रदीप पटवर्धन यांसारखे अनेक कलाकार या सिनेमात झळकले होते.
अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये आता कोणते नवे कलाकार झळकणार याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. तर आता नुकतीच नवरा माझा नवसाचा २ या सिनेमातील काही कलाकारांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, जयवंत वाडकर, अली असगर यांच्यासह अभिनेता स्वप्निल जोशी, संतोष पवार, सिद्धार्थ जाधव तसेच सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, निर्मिती सावंत, हेमल इंगळे या अभिनेत्री या सिनेमात झळकणार आहेत.
नवरा माझा नवसाचा २ या सिनेमातील स्टारकास्ट पाहून सोशल मीडियावर मिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावर कमेंट्स करत अनेकांनी सिनेमातील जुन्या कलाकारांना भरभरून प्रेम दिले. मात्र, सिनेमातून दुसरा नवस पूर्ण होत असताना सर्वांना रीमा लागू, कुलदीप पवार, प्रदीप पटवर्धन यांची आवर्जून आठवण येत आहे. तर दुसरीकडे, अनेकांना स्वप्निल जोशीला या सिनेमात पाहण्यासाठी फारसा रस नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. तसेच प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या परीने त्याच्या ऐवजी दुसऱ्या कलाकारांची नावं सुचवली आहेत.
त्यामुळे आता सिनेमाच्या पुढील अपडेटकडे सारेच डोळे लावून आहेत. या सिनेमाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून हा सिनेमा कधी एकदाचा प्रदर्शित होतोय याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.