उत्तम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा अभिनेता म्हणजे ‘विक्रांत मेस्सी’ (Vikrant Massey). विक्रांतने आजवर बालिका वधु, धरम-वीर अशा छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि क्रिमिनल जस्टीस, मिर्झापूर, या वेबसिरीज तर सध्याचा 12th फेल, तसेच हसीन दिलरुबा, लुटेरा, कॉपी यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतीने भरलेले चित्रपट सिनेसृष्टीला दिले.
12th फेल या सिनेमातून विक्रांत नुकताच पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसला. खरं म्हणजे तो केवळ दिसला नाही तर खऱ्या अर्थाने रुपेरी पडद्यावर झळकला. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. त्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर ओटीटीवर या सिनेमाची हवा अजूनही कमी होत नाहीये. या सिनेमाने केवळ रसिक प्रेक्षकांच्या मनाचा आणि बॉक्स ऑफिसचा ताबा घेतला नसून या सिनेमाने यंदाच्या अनेक फिल्मफेअर पुरस्कारांवरही आपले नाव कोरले आहे.
यामुळे प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांकडून विक्रांतवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. शून्यातून वर येऊन स्वतःच्या हिम्मतीवर त्याने त्याचं हे साम्राज्य उभं केले आहे. शून्यातून वर उभारी मारल्यामुळे त्याने कमी वयातच खूप गोष्टी अगदी जवळून पाहिल्या आहेत. त्याने हलाखीची परिस्थिती देखील स्वतः अनुभवली आहे. तर याच परीस्थितीमुळे तो एक चांगला धडा शिकला आहे, त्याबद्दल त्याने स्वतः काही आठवणी त्याच्या लाडक्या चाहत्यांसोबत शेअर केल्या.
तो म्हणाला की, “मी तेव्हा माझ्या मित्रांना घरी बोलावलं होतं, ते माझे फार घनिष्ट मित्र होते आणि मला त्याचा अभिमान आहे. पण या घटनेतून मला एक प्रकारच्या मानसिकतेविषयी तुम्हाला सांगायचं आहे. माझी आई फार उत्तम जेवण बनवायची अन् यासाठीच मी सगळ्यांना घरी जेवायला आमंत्रित केलं. जेव्हा ते माझ्या घरी आले अन् त्यांनी माझ्या घराची अवस्था पाहिली, तेव्हा ते थोडे निराश झाले. आमच्याकडे प्लॅस्टिकच्या खुर्च्या होत्या, भिंतींचा रंग निघत होता, घरच्या छताचे पोपडे पडले होते, स्वयंपाकघर देखील त्यांच्या मानाने फारसं स्वच्छ नव्हतं हे सगळं पाहून पुढच्या दिवसापासूनच त्यांच्या वागण्यात मला बदल दिसू लागला. ते सगळे त्या दिवशी घरी आले जेवले अन् एका तासातच सगळे तिथून काही ना काही कारण सांगून निघून गेले.”
सुरुवातीला त्याचे मित्र ग्रुपवर त्याच्याबद्दल खूप सारेजण गॉसिप्स करायचे. विक्रांतच्या या बाईटचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावरून चांगलाच व्हायरल होत आहे.