मंगळागौर म्हणजे काय?” वंदना गुप्ते यांनी दिले मजेशीर उत्तर:
सध्या सर्वत्र चर्चेत असलेला मराठी चित्रपट म्हणजे ‘बाईपण भारी देवा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.
केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सहा बहीणींच्या आयुष्यावर आधारित असून त्या सहाजणी काही कारणास्तव एकमेकींपासून वेगळ्या होतात आणि कौटुंबिक, वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांनाही आपल्या परीने तोंड देतात. हा चित्रपट प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतला असून चित्रपटातील गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या मुख्य भूमिकेत आहेत. तर हा चित्रपट चित्रपटगृहात चांगलीच कमाई करत असून शंभर कोटींचा टप्पा गाठणार का याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. काहीदिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले त्यावेळी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची संपूर्ण टिम उपस्थित होती.
यावेळी केदार शिंदे यांनी वंदना गुप्ते यांच्या मुलाखतीचा एक मजेशीर किस्सा सांगितला. एका मुलाखतीमध्ये वंदना गुप्ते यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की, “मंगळागौर म्हणजे काय?” त्यावेळी वंदना ताईंनी त्या प्रश्नाचं फारच मजेशीर उत्तर दिलं.
हा किस्सा सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या होत्या की, “मला एका पत्रकाराने मंगळागौर म्हणजे काय? असे विचारले होते. मला याबद्दल माहिती नव्हती. मी तिला म्हटलं, लग्नानंतर सर्व सभारंभ, सोहळे संपतात. त्यानंतर मग हनिमूनला जातात. त्याचा सर्व ताण काढण्यासाठी जे खेळ खेळले जातात, त्याला मंगळागौर म्हणतात. हा खेळ फार मजेशीर असतो. सासूला शिव्या द्या, नणंदेला शिव्या द्या असं सर्व त्यात असतं.”
त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वच खळखळून हसायला लागले. तर सध्या त्यांचं या मजेशीर उत्तराची सर्वत्रच चर्चा सुरु आहे.