मुंबईमध्ये एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी सर्वात सोयीस्कर साधन म्हणजे ‘मुंबई लोकल ट्रेन’. गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधून प्रवास करायला धाडस पाहिजे, हे सगळ्यांनाच जमत असं नाही. आणि हे धाडसी काम करायला लागू नये म्हणून अनेक जण ‘बस’ने प्रवास करतात.
आजपर्यत आपण अनेक कलाकारांना मुंबईच्या लोकल ट्रेन मधून प्रवास करताना पाहिले आहे. अनकेदा बॉलिवूड कलाकार देखील आपला चेहरा लपवून लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसून आले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील ट्रेनमधून प्रवास करत असतात. अशातच आपल्या एका लाडक्या मराठी कलाकाराने लोकल ट्रेनमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता म्हणजे ‘अमित भानुशाली’ (Amit Bhanushali). ‘ठरलं तर मग’ही स्टार प्रवाहवर सुरु असणारी मालिका सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या आधी अमितने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक वर्षानंतर अमितने मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. या मालिकेमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
अमित सोशल मिडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचा रोजच्या आयुष्यातील अनेक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच त्याने मुंबईच्या लोकल ट्रेन मधून प्रवास केला आहे. यावेळी त्याला जवळजवळ ५ ते ६ ट्रेन सोडल्यानंतर ट्रेनमध्ये चढायला मिळालं आहे. याचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ त्याने शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो शेअर करत त्यावर लिहिलं आहे की, “५ ते ७ ट्रेन सोडल्यावर मला आता गाडीत चढायला मिळालं”, तर दुसऱ्या फोटो मध्ये गर्दी कमी झाल्यानंतर त्याला मोकळा श्वास घेता आला आहे. या फोटोवर “अखेर मोकळा श्वास घेऊ शकतो” असं लिहिलं आहे. त्यानंतर एका व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये त्याला बसायला सीट मिळाल्याचं दिसून येत आहे. त्या व्हिडिओवर कॅप्शन देत लिहिलं आहे की, “सुख सुख सुख”.
त्याचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.