नवीन वर्ष आपल्यासाठी नवीन चित्रपटाची मेजवानी घेऊन आले आहे. एकानंतर एक असे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र आता सगळीकडे चर्चा सुरु आहे ती फायटर या चित्रपटाची. या चित्रपटात एकापेक्षा एक असे धुरंधर पात्र आहे. हृतिक रोशन, दीपिका ते अनिल कपूर असे सगळेच पात्र ट्रेलरमध्ये खुलून आले. हा चित्रपट एक एरियल अॅक्शन थ्रिलर आहे. देशासाठी काहीही करून जाण्याची धमक आणि विश्वासघाताचे उत्तर बदल्यातून देण्यासाठी तयार असलेले फायटर्स याचा उत्तम मेळ जमवून आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वाॅर आणि पठाण सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सिद्धार्थ आनंद ने केले असून २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे सध्या प्रमोशन सुरु असून दीपिका, हृतिक आणि अनिल सध्या चर्चेचा विषय बनलेत. मात्र या सगळ्यात ही अनिल कपूर आणि हृतिक रोशन यांची एक वेगळीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटातून हे दोघे पहिल्यांदा एकत्र आले असून त्यांच्यातला बाँड हा कुणाचाही नजरेतून लपला नाही. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनिल कपूर बद्दल आपले मत मांडताना दोघेही भावूक झाले.
Hrithik making Anil Kapoor emotional on stage 🤗🥺 pic.twitter.com/KJbyXEzHvI
— HrithikRules.com (@HrithikRules) January 23, 2024
‘फायटर’च्या प्रमोशनदरम्यान संवाद साधताना हृतिक म्हणाला, “मी अनिल सरांना सेटवर पाहत त्यांच्याकडून शिकून मोठा झालो. या चित्रपटात त्यांच्यासोबत काम करताना तो सगळा काळ आठवला. माझ्यासाठी ते खूप प्रेरणादायी आहेत. आज जो काय हृतिक तुम्ही पाहत आहात, त्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात अनिल कपूर जबाबदार आहेत.”
हे देखील वाचा: एक वादग्रस्त खेळाडू बिगबॉसच्या घरातून बाहेर…
हृतिकने पुढे ‘फायटर’च्या सेटदरम्यानचा एक किस्सा सांगितला. ‘फायटर’मध्ये अनिल कपूर यांचा एक सीन होता. हृतिकने जेव्हा तो पाहिला तेव्हा त्याला लक्षात आले की त्यात अनिल सरांनी किती मेहनत घेतली असावी. त्याबद्दल सांगताना हृतिक म्हणाला की, “अनिल सरांनी त्या संपूर्ण प्रसंगाला नवीन भावनिक वळण दिले. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाचा मार्ग निश्चित झाला. मी जेव्हा त्यांना सांगितलं आणि कौतुक केलं तेव्हा अनिल यांचे डोळे पाणावले होते. चार दशकं इतकं काम करुनही अजूनही अनेक गोष्टी करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्यादिवशी मी त्यांना फक्त पाहत होतो आणि शिकत होतो.”
हृतिक हे बोलत असतानाच अनिलला अश्रू अनावर झाले. मी इतक्या उदार अभिनेत्यासोबत काम केलेले नाही, असं म्हणत अनिलने हृतिकचं कौतुक केलं.