सध्या सर्वच कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिच्या लग्नाच्या रंगात बुडाले आहेत. पूजा लग्न करतेय हे समोर आल्यापासूनच नाही तर मागील काही वर्षांपासून पूजा कधी आणि कोणासोबत लग्न करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले होते.
पण अखेर तो दिवस उजाडला आणि तिने तिच्या जोडीदाराची पहिली झलक सर्वांना दाखवली. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पूजाने त्या दोघांचा फोटो शेअर केला, त्यात त्याचा चेहरा नीट दिसत नसल्यामुळे हा मिस्ट्री मॅन नक्की आहे तरी कोण? हा प्रश्न अनेकांना पडला. काही फोटोज् शेअर केल्यानंतर पूजाने तिच्या जोडीदाराचे नाव म्हणजेच सिद्धेश चव्हाण आणि त्याचा चेहरा जगासमोर आणला. त्यानंतर तिने सिद्धेशसोबतचे अनेक रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर केले.
तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते, त्यातच प्रार्थना बेहरे आणि भूषण प्रधान यांच्यासोबत पूजाच्या भावंडानी मिळून पूजा आणि सिद्धेश यांची ३१ डिसेंबरला बॅचलर पार्टी केली. त्या दरम्यान सिद्धेशने पूजाला लग्नासाठी विचारले. पूजाने होकार देताच १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पूजा आणि सिद्धेशचा साखरपुडा पार पडला. यावेळी पूजाने हिरव्या रंगाची आणि सोनेरी काठ असलेली साडी नेसून हातात मोत्याच्या बांगड्या अन नाकात नथ असा सुंदर मराठमोळा साज केला होता. तर सिद्धेशने देखील फिकट सोनेरी रंगाचा कुर्ता घातला होता. त्यानंतर पूजाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता.
साखरपुड्यानंतर पूजाच्या घरी व्याही भोजनाचा कार्यक्रम झाला. तर थेट त्यांच्या संगीतचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघांनी वेस्टर्न आऊटफिट निवडले. यांच्या संगीतसाठी अनेक कलाकार मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होता. पूजा आणि सिद्धेशसाठी अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकले. तर पूजा आणि सिद्धेशच्या रोमँटिक डान्सने सर्वांचे लक्ष वेधले.
संगीतनंतर पूजाच्या हातावर सिद्धेशच्या नावाची मेहंदी रंगली. यावेळी पूजाने डिझायनर बहुरंगी लेहेंगा आणि त्यावर भरजरी दागिने घातले होते. मेहंदीचा, प्रेमाचा आणि लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता.
लग्न घटिका समीप आली म्हणटल्यावर नवरीला आणि नवरदेवाला हळद लागली. पूजा आणि सिद्धेश यांची हळद चांगलीच गाजली. हळदीला पिवळ्या रंगाऐवजी जांभळा रंग निवडत पूजाने नवा ट्रेंड सेट केला. तसेच यावेळी हातात हिरवा चुडा आणि त्यात ‘सिद्धेशची नवरी’ असं लिहिलेल्या कलाईने साऱ्यांचेच लक्ष वेधले.
View this post on Instagram
गुलाबी रंगाची भरजरी काठ असलेली पिवळ्या रंगाची साडी, केसांत गजरा माथ्यावर मुंडावळ्या आणि चेहऱ्यावर गोड हसू असलेली पूजा आणि ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातलेला नवरदेव म्हणजेच सिद्धेश हे दोघेही सप्तपदीवेळी खूपच कलरफुल दिसत होते.
तर अरेंज मॅरेज असलेल्या पूजा आणि सिद्धेशचा जवळपास दीड वर्षाच्या रिलेशनशिपनंतर अरेंज कम लव्ह मॅरेज झाले. आणि मिस्टर अँड मिसेस कलरफुल यांनी आता साऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कलरफुल संसाराला सुरुवात केली.