दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) याने आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने जगभरात नाव कमावले तसेच आत्ता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी त्याचा एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षांच्या भेटीस येणार आहे. प्रभासचा आगामी चित्रपट म्हणजेच ‘सलार’ (Salaar) राधे श्याम व आदिपुरुष यांसारखे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाल्यावर प्रभासच्या आगामी ‘सलार’ची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. या सिनेमाच्या निमित्ताने केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासह प्रभास प्रथमच काम करणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आपल्या मित्राला राजगादीवर बसू न दिल्याचा बदला घेणाऱ्या ‘देवा’च्या भूमिकेत असलेला प्रभास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारनचीही मुख्य भूमिका असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट झालं. ही गोष्ट दोन मित्रांच्या मैत्रीची असली तर त्याला बदल्याची चांगलीच फोडणी असल्याचं ट्रेलरवरुनही समजत आहे. याबरोबरच प्रभासला अशा भूमिकेत आजवर कधीच पाहिलेलं नाही त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यास अगदी आतुर झाले आहेत.
त्यानंतर सलारचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला असून प्रभासच्या या चित्रपटामध्ये ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि ॲक्शन सीन्सने अनेकांचे लक्ष वेधले आहे. अंगावर शहारे आणणारा हा दमदार ट्रेलर आहे. जबरदस्त ॲक्शन स्टंटशिवाय अनेक नव्या गोष्टी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रभास एकदम डॅशिंग लूकमध्ये दिसत असून या चित्रपटामध्ये खानसार गावाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. “खानसार की कहानी तब बदली जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए” हा डायलॉग सलार या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकू येतो.
यापूर्वी हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता पण त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. म्हणजेच शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटाशी प्रभासच्या सिनेमात लोकप्रियतेवरून चुरस रंगणार हे नक्की. दिवाळी किंवा संक्रांतीला ‘सलार‘ रिलीज होईल अशी अपेक्षा होती, पण निर्मात्यांनी सुट्टीचा काळ निवडला.
प्रभासने त्याच्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत सलार चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. सलार हा चित्रपट तेलुगु, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून हा चित्रपट २ तास ५५ मिनिटे एवढा आहे. तसेच त्याने पोस्टरला कॅप्शन देत लिहिले की, “खानसाराच्या हिंसक जगात प्रवेश करा.” त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटासाठी भारीच उत्सुकता दिसत आहे.