कोरोनाच्या काळानंतर काही लोकांना या महामारीची झळ बसली नसेल परंतू देशातील अनेकांना बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतू या काळात सिनेसृष्टीतील अनेकजण मदतीसाठी पुढे सरसावले होते.
असाच एक अभिनेता म्हणजे सोनू सूद. (Sonu Sood) अभिनयासोबतच समाजसेवेसाठी देखील अनेकदा स्वत:हून पुढाकार घेत लोकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच त्याने स्वतःची चॅरिटी फाउंडेशन देखील सुरू केली आहे. तर आज पुन्हा एकदा सोनू सूद सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून आला.
सोनू सूदने आज महाराष्ट्रातील एका गावात त्याच्या फाउंडेशनकडून एक शाळा सुरु केली. ही शाळा महाराष्ट्रतील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे उभारण्यात आली आहे. सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शाळेचे नाव वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल असे आहे. या शाळेविषयी लोकांना माहिती व्हावी अनेकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी त्याने त्याच्या सोशल मीडियावरून शाळेबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या शाळेबद्दल सांगताना सोनू सूद म्हणाला की, “सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार संस्कारक्षम व कृतीयुक्त शिक्षण देण्याचा निश्चय Sonu Sood Foundation ने केला असून त्याकरिता वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलची स्थापना केली आहे.” तसेच सोनू सूदने शाळेत प्रवेश घेण्यासाठी सूद फाउंडेशनचे विपुल मिरजकर व विशाल काळे सर यांच्याशी आणि शाळेमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
सामान्य घरातली मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्याने हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च जरी फाउंडेशनतर्फे असला तरी मुलांचा गणवेश आणि त्यांच्या पुस्तकांचा खर्च पालकांना करावा लागणार आहे.
सोनू सूदच्या या नवीन उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. तसेच त्याच्या चाहत्यांना देखील त्याचा अभिमान वाटत आहे.