मराठी इंडस्ट्रीत ज्याची चॉकलेट बॉय अशी ओळख आहे असा स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आता लवकरच अजून एक नवा चित्रपट घेऊन येतोय. वैविध्यपूर्ण चित्रपट आणि भूमिका साकारून त्याने आजवर प्रेक्षकांचं मनमुराद मनोरंजन केलं. स्वप्नील नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो आणि आता त्याचा ‘बाई गं’ हा चित्रपट देखील तितकाच वेगळा आणि खास आहे.
स्वप्नीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल चर्चा केली. तो म्हणतो “येणाऱ्या काळात लव ट्रँगल बदलावा लागणार असून मी तब्बल ६ अभिनेत्रीच्या सोबतीने एकटा हिरो म्हणून बाई गं मध्ये दिसणार आहे. कायम लव्ह स्टोरी करताना लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोडं बदलणार आहे आणि मी वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्री सोबत दिसणार आहे. विभिन्न विचाराच्या आणि विविध वयोगटातील अभिनेत्रींसोबत काम करण्याचा अनुभव देखील तितकाच कमालीचा होता. या सहा अभिनेत्री सगळ्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नेहा खान, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहेरे अशा अफलातून अभिनेत्रींची फौज बाई गं मध्ये दिसणार आहे.”
आता स्वप्नीलच्या ‘बाई गं’बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार? हा प्रश्न सगळ्यांना पडला असून लवकरच स्वप्नील याबद्दल सांगणार आहे. २०२४ ची सुरुवात स्वप्नील ‘नाच गं घुमा’ पासून करत असून येणाऱ्या वर्षात तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समधून दिसणार यात शंका नाही.
सध्या स्वप्नील त्याची निर्मिती असलेल्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि येणाऱ्या काळात तो प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन करणार यात शंका नाही.