शाहरुख खानचा पठाण चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील बेशरम या गाण्यामुळे ह्या चित्रपटाची सोशल मिडियावर खूप चर्चा चालू आहे. सोशल मिडियावर अनेकांकडून या चित्रपटावर बहिष्काराची मागणी असली तरीही चातकाने वसंत ऋतूची जशी वाट पहावी तसेच शाहरुख खानचे चाहते पठाण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप कमी दिवस राहिले असूनही पठाणचा ट्रेलर प्रदर्शित न झाल्याने चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. तरी ‘पठाण’चा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख अनेकदा ट्विटरद्वारे चाहत्यांशी संवाद साधतो. #AskSRK अशा हॅशटॅगअंतर्गत तो ट्विटरवर चॅट सेशन करतो. दरम्यान बुधवारीही १५ मिनिटांसाठी शाहरुख ट्विटरवर सक्रिय होता आणि त्याने विविध प्रश्नांची उत्तरं दिली. अगदी आलिया भट्टच्या प्रश्नाचे उत्तरही त्याने दिले.
इतरही काही युजर्सना त्याने त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिली. शाहरुखच्या #AskSRK सेशनमध्ये त्याचा विनोदी अंदाज पाहायला मिळतो, आजही त्याने काही विनोदी ट्वीट केले आहेत. मात्र एका ट्वीटने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि युजर्सकडून त्याचे कौतुक होत आहे. एका युजरने असा सवाल केला होता की, ‘खानसाहेब, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काश्मिरी आहे ना? तरीही तुम्ही तुमच्या नावासोबत खान का जोडता?’ याचे उत्तर देताना शाहरुख म्हणतो की, ‘संपूर्ण जग हे माझं कुटुंब आहे.
कुटुंबाच्या नावामुळे नाव मोठं होत नाही, तुमच्या कामामुळे तुमचं नाव होतं. कृपया अशा संकुचित विचारात अडकू नका.’ शाहरुखच्या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय देत त्यांची मत मांडली आहेत. काहींनी त्याच्यावर टीका केलीये तर काहींना एसआरकेची स्टाइल आवडली आहे.