मागील काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘देवयानी.’ या मालिकेमुळे नवोदित कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. देवयानी ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘शिवानी सुर्वे’ (Shivani Surve) या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. मालिकेनंतर शिवानी ‘बिग बॉस मराठी’मधून देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आली. तर त्यावेळी तिने तिच्या खऱ्या स्वभावाने तिच्या चाहत्यांचे मन जिंकून घेतले. त्यानंतर छोट्या पडद्यापासून ती रुपेरी पडद्याकडे वळाली. तर आता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या सिनेमात देखील शिवानी झळकली आहे.
या सिनेमातील तिचे काम प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरले. त्यामुळे सध्या तिची वाहवाह होताना दिसत आहे. शिवानीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर गेली काही वर्षे ती अभिनेता ‘अजिंक्य ननावरे’सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अजिंक्य सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शिवानी आणि अजिंक्य यांचं नातं जास्त काळ लपून राहिलेलं नाही आणि त्यांनीही ठेवलं नाही. परंतू नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शिवानीने त्यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या नात्याला घरच्यांची परवानगी कशी मिळाली याबद्दल भाष्य केले.
शिवानीने सांगितले की, “तू जीवाला गुंतवावे या मालिकेमुळे अजिंक्य आणि माझी भेट झाली. खरंतर, त्या मालिकेत अजिंक्यची एन्ट्री मध्येच झाली होती. त्याच्या एन्ट्रीनंतर ३ महिन्यांनी ती मालिका बंद झाली. तेव्हा आमची एकमेकांशी अगदी बेसिक हाय-हॅलो करण्यापर्यंत मैत्री होती. पण, मालिका संपल्यावर हे काहीतरी वेगळं आहे याची जाणीव मला झाली. आपण इतर खूप कामं करतो, त्यानंतर घरी जातो…कोणाच्या आयुष्यात जास्त दखल देत नाही. पण अजिंक्यच्या बाबतीत मी सारखी प्रत्येक गोष्टीची दखल घेत होते आणि यापुढेही घेत राहीन. अशारितीने आमच्या नात्याला सुरूवात झाली होती.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “तो खरंच खूप जास्त चांगला आहे. आमचे स्वभाव एकदम विरुद्ध आहेत. मी जेवढी बोलते किंवा व्यक्त होते तो माझ्या या स्वभावापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. अजिंक्य खूप जास्त शांत आणि समजूतदार आहे. मालिका संपल्यावर आमच्या भेटीगाठी वाढल्या, एकत्र दिवस घालवणं या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आम्ही एकमेकांना कधीच प्रपोज वगैरे केलं नाही. एकत्र आलं पाहिजे असं आम्हाला मनातून वाटलं.”
तर दोघांच्या कुटुंबीयांनी कशी परवानगी दिली, हे सांगताना शिवानी म्हणली की, “२०१५-१६ च्या दरम्यान आमच्या रिलेशनशिपला सुरूवात झाली. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच साधारण २०१७ मध्ये आम्ही आमच्या नात्याबद्दल घरी सांगितलं होतं. मी माझ्या आईला सर्वात आधी कल्पना दिली होती. त्यानेही त्याच्या घरी सांगितलं आणि दोन्ही घरातून आमच्या नात्याला ठळक विरोध आला. हे फक्त आकर्षण आहे असं आमच्या घरच्यांचं मत होतं. तुम्हाला वाटत असेल तुमचं प्रेम खरं आहे आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा, तर तुम्ही दोघेही आम्हाला एकत्र राहून दाखवा असं आम्हाला घरुन सांगितलं गेलं. आता अजूनपर्यंत आम्ही त्यांना एकत्र राहून दाखवत आहोत. लॉकडाऊन सुरू झाल्यावर आई-बाबांना आमच्या नात्यावर विश्वास बसला. त्याचे बाबा म्हणाले, जर तुम्ही लॉकडाऊन न भांडता काढताय, तर तुम्ही आयुष्यभर एकत्र राहू शकता. त्यामुळे असं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने ४ वर्षांनंतर आमच्या घरच्यांनी या नात्याला परवानगी दिली. आता सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत लवकरच आम्ही चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ.”
त्यामुळे या मुलाखतीनंतर शिवानी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच चाहते शिवानीच्या लग्नासाठी देखील प्रचंड उत्सुक आहेत.