सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला. याच सिझनमधून प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायन हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले.
मागील काही दिवसांपासून ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते दोघेही त्यांच्या गायनामुळे चर्चेत नसून एका खासगी कारणामुळे चर्चेत आले आहेत. प्रथमेश आणि मुग्धा या दोघांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोघांचा फोटो शेअर केला आणि कॅप्शांमध्ये “आमचं ठरलं!” असं लिहित त्यांच्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली. त्यांच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
त्यानंतर त्या दोघांनी नुकतीच एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी सांगितली. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की या दोघांची ओळख सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचापासून झाली. त्यानंतर त्या दोघांनी अनेक कार्यक्रम एकत्र केले, आजही करीत आहेत. तसेच मागील काही वर्षांत ते दोघे अनेकदा एकत्र काही ठिकाणी आढळले होते. त्यामुळे काहींनी ते दोघे डेट करत असल्याची शक्यता देखील वर्तवली होती.
एकदा त्यांच्या कार्यक्रमाची तालीम सुरु होती. त्यादरम्यान त्या दोघांच्या भरभरून गप्पाही होत होत्या. तेव्हा प्रथमेशने मुग्धाला त्याच्या मनातील भावना स्पष्टपणे सांगितल्या. प्रथमेश कधी ना कधी तिला हे विचारणार हे मुग्धालाही अपेक्षितच होते. तसेच ती काय उत्तर देणार हेही प्रथमेशला चांगलेच माहित होते. पण तरीही मुग्धाने त्याला होकार द्यायला तीन-चार दिवस घेतले.
मुग्धाने स्वतः त्याला एक दिवस भेटायला बोलावून होकार दिला होता. त्यांनतर ते आतापर्यंत मागील तीन ते चार वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. परंतू त्यांनी मुग्धाचं शिक्षण पूर्ण होई पर्यंत कुणालाही न सांगण्याचा निर्णय घेतला. आता नुकतच पाच-सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या नात्याविषयी आणि प्रेमाबद्दल त्यांच्या घरच्यांना सांगितले.
View this post on Instagram
खास गोष्ट म्हणजे त्या दोघांनी एकाच दिवशी, एकाच वेळी त्यांच्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले. तसेच मुग्धा म्हणाली की, “जर आणखीन थोडा जरी उशीर केला असता तर आमच्या घरच्यांनीच पुढाकार घेऊन तुमचं काय चाललंय? असं विचारलं असतं.” तर प्रथमेश म्हणाला की, “आम्ही एकमेकांच्या घरच्यांना लहानपणापासून ओळखतो. आमच्या नात्याबद्दल घरी सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया अगदी साधी होती. निश्चितच त्यांना आनंद झाला. आता लवकरच पुढील गोष्टी ठरतील.”
त्यामुळे आता हे दोघे कधी लग्नगाठ बांधणार याचीच वाट सर्वजण उत्सुकतेने पाहत आहेत.